कविता
आठवणी
अजित जावळे
या अंधारल्या रात्री,
एकटाच मी जागा ।
मनामध्ये भावनांचा,
एकसारखा हा त्रागा ।।१।।
भूतकाळातील कडू-गोड,
आठवणींचा आला पूर ।
आणि मनामध्ये फुटले,
जसे अनेक हे सूर ।।२।।
या विषण्ण रात्रीत,
सारा अंधार दाटला ।
आणि रातकिड्यांच्या आवाजाने,
उरी अंधार साठला ।।३।।
या मनातील भावनांचे,
रंग जरी वेगळे ।
जसे एकाच हत्तीचे,
वर्णन करती आंधळे ।।४।।
झोप माझी ही उडाली,
जरी मध्यरात्र सरलेली ।
समोरची पाऊलवाट जशी,
पूर्ण काट्यांनी भरलेली ।।५।।
मात्र या अंधकारात,
एक तेवत होता दिवा ।
माझ्याच पूर्वपुण्याईचा,
होता काय तो ठेवा ।।६।।
आठवणी या शमविण्यासाठी,
पुन्हा गेलो मी झोपी।
आणि परत एकदा मी,
घातली मनालाच टोपी ।।७।।
बलिदान!!!
चैत्राली
अलाटे
आठवा स्वातंत्र्य संग्राम
कोटींनी दिले बलिदान |
देशासाठी लढले ते,
देशासाठी मरण पावले |
सोडूनी हे जग सारे,
हुतात्मे होऊनी गेले ते |
प्राणाची चिंता न करता,
अहंकाराचा नाश केला |
सोडूनी सारे घरदार,
मुठीत धरला प्राण |
आठवणींचे ठसे उमटूनी,
थोर क्रांतिकारी गेले स्वर्गी |
आठवूनी कासावीस होतो जीव,
असंच दिले त्यांनी बलिदान |
पाऊस अजून पडत होता
गौरी
पवार
पाऊस अजून पडत होता
अंधाराच्या कुशीत शिरून
पाऊस अजून रडत होता
कधीच सरली रात्र तरीही
पाऊस अजून पडत होता....
काही श्वास तगून होते
बाकी सारे गाडले गेले
मातीच्या ढिगाऱ्याखाली
पाऊस अजून कण्हत होता....
रात्रीत हरवले बालपण
न विसरावी अशी ती आठवण
हरवलेले, विसरलेले
पाऊस अजूनही शोधत होता....
कधीतरी संपले अश्रू
आक्रोशही आटून गेले
विझलेल्या चितांवर
पाऊस अजून पडत होता....